निवडणुका म्हणजे कार्यकर्ते मतदारांसाठी दिवस जणू दिवाळीच ! पाच वर्ष चातक पक्षाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणारे हे लोक काहीसे नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या उत्सवाला प्रारंभ होऊन दोन आठवडे लोटले तरी काहीच गवसले नसल्याची तक्रार ही मंडळी खाजगीत करते. गण्या, रम्या, संज्या यांच्यातली ही भांडण पारावर चर्चेचा विषय बनली आहे. रात्रीच्या अंधारात त्या गल्ली ला कोण गेलं आणि या गल्लीला कोणाला यावर नजर ठेवणारे रात्र रात्र जागून ही हाती काहीच गावत नसल्याची व्यथा बोलून दाखवतात. निरोप येण्याची वाट पाहत दिवसंदिवस ताटकळत बसणारे हे पठ्ठे आता पार दमले आहे. कोणताच उमेदवार अजून खिसा मोकळा करायला तयार नाही. गंमत म्हणजे हा एवढा संशयकल्लोळ वाढला असला तरी उमेदवारांना त्याचे काही देणे घेणे नाही. गेल्या दहा दिवसांपासून उमेदवारांनी जणू डोळे बंद करून घेतल्याचे दिसते. निवडणूका आणि पैशांचा वारेमाप पाऊस असं समीकरण घट्ट डोक्यात बसलेल्यांची अवस्था पाहण्यालायक झालीये. एरवी गाड्यांची आणि खाण्यापिण्याची सोय करून मोकळे होणाऱ्या उमेदवारानी अजूूूनही निव्वळ 'कपभर चहा...अन घराचा रस्ता पहा...! असाच प्रकार सुरू ठेवलाय. कार्यकर्त्यांत मात्र निव्वळ संशयकल्लोळ वाढलाय जो तो एकमेकांकडे संशयाने बघतोय त्याच्याकडे काल माल आला. त्याला साहेबांनी बोलावलं, साहेबांची माणसं त्याच्याकडे येऊन गेली असे गमतीदार किस्से घडत आहेत. निवडणुकीचे उन्हाळे-पावसाळे पाहणाऱ्यांना या स्थितीचे आश्चर्य वाटते.
नव्याकोऱ्या गाड्यांचा लवाजमा, त्याच्यावर फडकंणारी मोठंमोठी झेंडी, हातात माईक घेऊन ओरडणारे कार्यकर्ते अन त्यांच्या जेवणावळीचा थाट हे चित्र अजूनही दिसेना झाले आहे. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांच्या हातात येणारे नवीकोरेे मोबाईल, उंची कपड्यांचा साज त्यावर शिंपलेले अत्तर आणि खिसा मोकळा करीत मतदारांना खूष करणारे कार्यकर्ते आताकाळाच्या उदरात गायब झाले की काय ? असा प्रश्न पडतो. उमेदवारांच्या नावावर भन्नाट खर्च करणारी ही मंडळी आता दिसत नाही. चहा पाजण्याची ही ददात राहिली नाही राव ? अशी गोड तक्रार ही मंडळी करते, तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. शहरासह ग्रामीण भागातल्या झुंडीच्या झुंडी सकाळीच पक्ष कार्यालयावर येऊन धडकतात. तेव्हा आता यांना कसे समजावून सांगावे, याची चिंता उमेदवारांच्या प्रचार प्रमुखाला पडते. हा बदल कसा झाला याचे काही चमत्कारिक किस्सेही ऐकायला मिळतात. मोदींच्या नोटबंदीने घोळ झाला राव, इन्कम टॅक्स वाल्यांनी छापेमारी सुरू केली अशी पुडी सोडून उमेदवाराचे लोक कार्यकर्त्यांना जरा दम धरा असा सल्ला देत आहेत. तर पैशाने मतदान घेण्याचे दिवस संपले अशी दमदार वाक्यही कानी पडत आहेत. नवख्या उमेदवारांनी हात मोकळा केला असला तरी अनुभवी उमेदवार अखेरच्या क्षणी हात सैल लेट सोडतील अशी अशा कार्यकर्त्यांना लागून आहे. आर्थिक चणचणीतली ही पहिलीच निवडणूक, असा कल्ला करणारी तोंडे जास्त दिसून येतात. निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी, खर्चावर आलेले नियंत्रण आणि महाग होत चाललेली निवडणूक यामुळे उमेदवारच आता चलाख झालेत. प्रचारासाठी अवघे दहा अकरा दिवस हातात आहेत. अजूनही दोन-तीन दिवस उमेदवार लॉकर खोलणार नाहीत. शेवटच्या आठ दिवसात पोळा फुटेल जो सावध राहील.. तोच धनको पाहिल... यात शंका नाही.